सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने जवळपास 9 तास चौकशी केली. यादरम्यान, रिया चक्रवर्ती ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकली नाही. रिया मुंबईमधील ईडी कार्यालयालयात भाऊ शौविकसोबत गेली होती.
दरम्यान, यात रियाच्या मुंबईस्थित दोन फ्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. हे फ्लॅटस सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून घेतल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, ईडीच्या चौकशीमध्ये हे दोन्ही फ्लॅट मी स्वत: घेतले आहेत, असं उत्तर रियाने दिल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे.
रिया चक्रवर्तीची मॅनेजर श्रुती मोदीची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. श्रुती मोदी सुशांत सिंह राजपूतसाठीही काम करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती आणि मोदी यांचे जबाब ईडीने नोंदवून घेतले आहेत.




