मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई महापालिकेने 16 टक्के गणेश मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या अगोदर 3000 पेक्षाही अधिक मंडळं मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागायचे. यावर्षी एकूण 1273 मंडळांनी मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी केवळ 519 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी असे असतील निर्बंध
- मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मूर्तीची उंची जास्तीत जास्त 4 फूट आणि घरगुती गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त 2 फूट असावी, असं म्हटलं आहे.
- यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
- मंडळांनी मूर्तींचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं आणि गर्दी टाळावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
- एका वेळी मंडपात जास्तीत जास्त 5 कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.
- जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
- गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.




