मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले १ लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे फोटो आढळून येत नाही, अशा मतदारांनी आपले नाव ज्या मतदारसंघात आहे तिथे जाऊन आपले फोटो ८ जुलै २०२१ पूर्वी जमा करावीत, अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, असे महत्त्वाचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
निर्धारित वेळेत फोटो जमा न केल्यास आपण सदर मतदारसंघातून स्थलांतरित झाला आहात अथवा आपण सदर मतदारसंघात रहात नाही, असे गृहित धरण्यात येऊन आपले नाव मतदारयादीतून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले असून याविषयी काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपले काही आक्षेप असल्यास संबंधित जवळच्या मतदारसंघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोग मतदारयाद्यांमध्ये फोटो समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. दोष रहित व अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीतील फोटो नसलेल्या मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी फोटो गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदारसंघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. फोटो नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदारसंघाच्या कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




