इंग्लंड : एका महिलेने आपल्या 81 वर्षीय पतीवर साखर घालून उकळलेले पाणी ओतले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 59 वर्षीय महिलेचे नाव कोरीना बेन्स आहे. ही महिला एका किरकोळ कारणावरून नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यातून तिने हे भयंकर कृत्य केले. आता या प्रकरणात कोरीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय कोरीना बेन्स या महिलेचा 38 वर्षांपूर्वी मायकल बेन्स यांच्याशी विवाह झालेला होता. दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी (13 जुलै 2020) कोरीना आपल्या मुलीबरोबर शॉपिंगसाठी गेली होती. परंतु, तिच्या नवऱ्याने तिला लवकर घरी बोलावून घेतले. त्यावरून कोरीना आपल्या नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यावेळी कोरीना काहीही बोलली नाही, पण तिला आपल्या नवऱ्याचा खूप राग आला होता. त्यामुळे तिने तिचा नवरा झोपी गेल्यानंतर पाणी उकळून त्यात तीन किलो साखर टाकली. हे गरम मिश्रण एका बादलीत ओतले. त्यानंतर या महिलेने हे उकळते पाणी झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर फेकले. यामध्ये मायकल बेन्स यांचे शरीर ३६% भाजले.
डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर पॉल ह्यूजेस यांनी सांगितले कि, “कोरीनाने तिच्या नवऱ्याच्या अंगावर फक्त उकळते पाणी फेकले नाही, तर त्यात तीन किलो साखरही मिसळली होती. उकळत्या पाण्यात साखर टाकल्यानंतर हे मिश्रण खूपच प्राणघातक होते. हे मिश्रण खूप घट्ट आणि चिकट होते आणि त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. यातून या महिलेला आपल्या पतीला किती वेदना द्यायच्या होत्या याची कल्पना येते. ते पुढे म्हणाले की, या महिलेने हल्ला केल्यानंतर रुग्णवाहिका बोलावली नाही. त्याऐवजी ही महिला काही अंतरावर राहणाऱ्या एका शेजार्यांकडे गेली. तिथे जाऊन ती म्हणाली कि, “मी माझ्या नवऱ्याला नुकसान पोहोचवले आहे, कदाचित मी त्याला मारून टाकले आहे.” त्यानंतर शेजाऱ्यांनी घाबरुन तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना कॉल केला.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मायकल बेन्स बेडवर विव्हळत पडलेले होते, त्यांना खूप वेदना होत होत्या. त्यांच्या शरीराचा एक तृतीयांश भाग भाजला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरीनाने हत्येची कबुली दिली. न्यायालयाकडून कोरीनाला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.




