मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
१ जून २०२१ रोजी एसटीचा ७३ वा वर्धापनदिन पार पडला, कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मंत्री, ॲड. अनिल परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलताना मंत्री, अॅड. परब यांनी कामगारवर्गाला मोठा दिलासा देत आश्वस्त केले.
कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना एस.टी. मध्ये नोकरी दिली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना एस.टी. महामंडळामार्फत ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. pic.twitter.com/Kj25WF7n6h
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) June 1, 2021
परिवहनमंत्री अॅड. अनिल परब म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ३० जून २०२१ पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्याचे येईल.
आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
ते पुढे म्हटले कि, कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, सध्या एसटी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी पुन्हा एकदा उभारी घेईल, असा ठाम विश्वास आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देशही अनिल परब यांनी यावेळी प्रशासनाला दिले.




