अहमदनगर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे, कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या होत्या. तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले होते.
कांताबाईंचा जन्म गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी झाला. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे कांताबाई त्यांच्या छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करायच्या. पुढे त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम केल्यानंतर त्या मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून काम करताना त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला.
खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. १९६४ मध्ये तुकाराम खेडकर यांचे अचानक निधन झाले आणि कांताबाईंची परिस्थिती ढासळली.परंतु, तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडशी होत्या. कांताबाईंना दुसऱ्याच्या फडात काम करणे रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने स्वतःचा तमाशा फड उभा केला.
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनावर डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांताबाई सातारकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले कि, “सातारकर यांच्या अकस्मात मृत्यूने धक्का बसला आहे. त्यांनी आयुष्यभर कलेची पूजा केली. शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या मनोरंजनाचे व्रत त्यांनी सलग सात दशके सांभाळले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेचे मोठे नुकसान झाले आहे.”
कांताबाई सातारकर यांच्या रूपाने लोकनाट्य क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले.
लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे मोठे काम त्यांनी आयुष्यभर केले.
कांताबाई यांच्या प्रमुख भूमिका असलेली विविध सामाजिक आणि राजकीय विषयावरील वगनाट्य गाजली. pic.twitter.com/dV0b1HEngj
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 25, 2021




