Oxygen production project started by Saibaba Trust
अहिल्यानगर महाराष्ट्र

श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने सुरु केला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

अहमदनगर : श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती राज्यातच होईल, यासाठी प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. आपल्याला ऑक्सीजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले. आपल्या राज्यासाठी आवश्यक ऑक्सीजन निर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी असे प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत. साईबाबा संस्थानने हाच सेवेचा वारसा पुढे चालविल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले, संस्थानने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. याशिवाय, आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी या प्रकल्पाकरीता रिलायन्स फांऊडेशन तर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले असल्याची माहिती दिली. संस्थानच्या वतीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट असून त्याद्वारे साईनाथ रुग्णालयातील 300 बेड करीता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरण पूरक असून तो 24 तास कार्यरत राहणार असून त्याकरीता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत