पत्नीने पॉर्न पाहिल्याचा किंवा हस्तमैथुन केल्याचा दावा करत पती तिच्या विरोधात घटस्फोट मागू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने १९ मार्च २०२५ रोजी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायालयाने म्हटले की, खाजगीरित्या पॉर्न पाहणे हे गुन्हा नाही आणि त्यावर घटस्फोटाची मागणी केली जाऊ शकत नाही. याच प्रकारे, हस्तमैथुन देखील घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असे सांगत न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला.
न्यायालयाने म्हटले की, खाजगीरित्या पॉर्न पाहणे किंवा हस्तमैथुन करणे हे वैवाहिक क्रूरतेचे लक्षण नाही. न्यायालयाने अधिक स्पष्ट करत सांगितले की, जर दुसऱ्या जोडीदाराने पॉर्न पाहण्यास भाग पाडले नाही तर ते क्रूरता ठरू शकत नाही. तसेच, पत्नीने हस्तमैथुन केले तरी त्यावर पतीला घटस्फोटाची मागणी करण्याचा अधिकार नाही. पॉर्न पाहणाऱ्या जोडीदाराच्या मानसिक आरोग्यावर ते परिणाम करू शकते. परंतु, ते जोडीदाराशी क्रूरतेने वागण्यासारखे ठरणार नाही. जर पॉर्न पाहणारा दुसऱ्या जोडीदाराला त्याच्यासोबत सामील होण्यास भाग पाडत असेल, तर ते निश्चितच क्रूरता ठरेल.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की अशा आरोपाला उत्तर देण्यास सांगणे हे महिलेच्या लैंगिक स्वायत्ततेचे घोर उल्लंघन असेल. हस्तमैथुन करणाऱ्या पुरुषांना असा कोणताही कलंक लावला जात नाही तेव्हा महिलेने हस्तमैथुन करणे हे का गंभीरपणे कलंकित केले जाते असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. हस्तमैथुन केल्यानंतर पुरुष लगेचच लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत, परंतु महिलांच्या बाबतीत असे होणार नाही. पत्नीला हस्तमैथुनाची सवय असल्यास पती-पत्नीमधील वैवाहिक संबंधांवर परिणाम होईल हे स्थापित झालेले नाही. याशिवाय, न्यायालयाने उल्लेख केला की, याचिका दाखल करणाऱ्या पतीने पत्नीच्या पॉर्न पाहण्याचे किंवा हस्तमैथुन करण्याचे पुरावे सिद्ध केले नाहीत. न्यायालयाने पतीचे आरोपांना खोटी ठरवले आणि त्याच्या याचिकेला फेटाळून लावले.
न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीला तिच्या लैंगिक स्वायत्ततेचा अधिकार आहे आणि पती-पत्नीच्या गोपनीयतेचा आदर राखणे आवश्यक आहे. विवाह झाल्यानंतर, एखाद्या महिलेने विवाहाबाहेर लैंगिक संबंध ठेवले तर ते घटस्फोटासाठी आधार देईल. मात्र, पत्नीच्या आत्म-सुखाच्या अधिकाराचे उल्लंघन करणे योग्य ठरणार नाही. स्व-सुखात गुंतणे हे विवाह विघटनाचे कारण असू शकत नाही.
याशिवाय, पतीने पत्नीवर लैंगिक आजार (STD) असल्याचा आरोप केला होता, परंतु न्यायालयाने त्याच्या आरोपांचा पुरावा नसल्यामुळे त्यास नाकारले. न्यायालयाने असे नमूद केले की पतीने फक्त आयुर्वेदिक केंद्राच्या काही अहवालांचा संदर्भ दिला. वैद्यकीय रक्त चाचणी अहवाल नसल्यामुळे, न्यायालयाने पतीचा आरोप फेटाळून लावला. न्यायालयाने म्हटले, “आयुर्वेद ही भारतीय औषधांची एक अत्यंत आदरणीय आणि मान्यताप्राप्त प्रणाली असली तरी, प्रतिवादी लैंगिक आजाराने ग्रस्त आहे हा आरोप केवळ रक्त चाचणी अहवालावरच सिद्ध करता आला असता. यावरून कोणीही खोटा आरोप लावला गेला असा निष्कर्ष काढू शकतो.”
न्यायालयाने हे देखील म्हटले की, दुसऱ्या जोडीदाराला लैंगिक आजार असल्यास, त्याची चूक नसल्याचे सिद्ध करण्याची संधी त्याला द्यावी लागेल. जोडीदाराला लैंगिक आजार आहे असा आरोप करणे गंभीर कलंक निर्माण करते. म्हणूनच, या आरोपाचा ठोस पुरावा आवश्यक आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीला त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीतूनही लैंगिक आजार होऊ शकतात. काही वर्षांपूर्वी, एका महिलेला सरकारी रुग्णालयात गर्भधारणा तपासणीसाठी गेले असता दूषित रक्त संक्रमणामुळे तिला एचआयव्हीची लागण झाली. या परिस्थितीत तिचा कोणताही दोष नसताना तिच्या जोडीदाराच्या सांगण्यावरून तिचे लग्न मोडणे योग्य ठरेल का? तर नाही ठरणार. अखेर, न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट केले की, घटस्फोटाच्या मागणीसाठी मजबूत पुरावे आवश्यक असतात.
पतीने तिच्यावर अनेक आरोप केले, जसे की ती खर्चिक आहे, पॉर्नचे व्यसन, हस्तमैथुन करणे, घरकाम करण्यास नकार देणे, सासरच्या लोकांशी वाईट वागणूक आणि फोनवर दीर्घ संभाषणात गुंतलेली होती. तथापि, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की तिच्या पतीने कोणतेही आरोप पुरेसे सिद्ध केले नाहीत.