गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फोगटच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या फोगट यांना हृदयविकाराचा संशय आल्याने त्यांना मंगळवारी सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. बुधवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) पोस्टमॉर्टम होणार होते, परंतु फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी दावा केला की सोनालीच्या दोन साथीदारांनी तिची हत्या केली आहे. गोवा पोलिसांनी या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतरच कुटुंबीय शवविच्छेदनास परवानगी देतील, असे ढाका म्हणाले.
सोनाली फोगटच्या भावाने गोवा पोलिसांत सोनालीच्या दोन साथीदारांनी तिची हत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. ढाका म्हणाले की, मृत्यूपूर्वी सोनाली आई, बहीण आणि भावाशी बोलली होती. त्यावेळी ती घाबरलेली होती आणि तिच्या दोन सहकाऱ्यांविरोधात तक्रार करत होती.
बहिणीच्या मृत्यूनंतर त्यांच्या हरियाणा फार्महाऊसमधून सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्याचा दावा ढाकाने केला. ढाका यांनी पोलिस तक्रारीत असेही म्हटले आहे की तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या एका साथीदाराने तिच्या जेवणात काहीतरी मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला ब्लॅकमेल केले. या तक्रारीवर अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले की, राज्य पोलीस फोगट यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करत आहेत. सावंत म्हणाले की, डॉक्टर आणि गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या मते, फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे दिसते.




