गुजरात : फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. आज (१ एप्रिल २०२५) गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात दीसा शहराजवळ ही घटना घडली. आगीमुळे एकामागोमाग स्फोट झाले, ज्यामुळे इमारत कोसळली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात स्फोट झाला. आग लागल्यानंतर एकामागोमाग झालेल्या स्फोटांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. आग मोठी असल्यानं धुराचे लोट निघत होते. अग्निशमन दलाने तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनीही बचाव कार्य सुरू केले आहे. बचाव पथकांनी इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरु केले. जखमींना नजिकच्या दीसा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक जखमी गंभीर भाजले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकायला गेला. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याच्या एका भागाचं मोठं नुकसान झालं. कारखान्यातील भिंती, छप्पर कोसळलं असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत.
स्फोटांमुळे इमारत कोसळली
फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे गोदामाचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले आहेत. ढिगारा हटवून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डीसाच्या उपजिल्हाधिकारी नेहा पांचाळ यांनी दिली.