नागपूर : १० वर्षांच्या मुलीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना ३ मार्च रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. ही घटना कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगनाबोडी गावात घडली.
याप्रकरणातील आरोपी तरुण एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित मुलगी ही त्याची सख्खी चुलत बहीण असून इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी आहे. या दोघांची घरे शेजारीच आहेत. त्याने ३ मार्च रोजी सकाळी या मुलीला दुकानात काही सामान आणायला पाठविले. तिने सामान आणून दिले तेव्हा त्याने तिला घरात बोलावले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, झालेला प्रकार पीडित मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.




