मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांना पीएपी (प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल) सदनिका देण्यासंदर्भातील कार्यवाही गतीने सुरु केली जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या विविध यंत्रणांची समन्वय समिती स्थापन केली जाईल आणि मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य श्रीमती विद्या ठाकूर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे माहुल येथे प्रकल्पबाधितांना पाठविण्यात येत नाही. तसेच त्यांना मूळ जागेच्या 5 किलोमीटर परिसरात जागा उपलब्ध असेल, तर तेथे निश्चितपणे पाठविले जाईल. प्रत्येक विभागात 55 हजार घरे बांधण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. याशिवाय, बांधकाम व्यावसायिकांकडून पुढील 3-4 वर्षात 2 हजार घरे प्रकल्पबाधितांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामांसाठी विभागनिहाय हे अधिकारी नेमले होते. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, राम कदम, अतुल भातखळकर, अमिन पटेल, मनीषा चौधरी, यामिनी जाधव, डॉ.भारती लव्हेकर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदींनी सहभाग घेतला.




