ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.
डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रमोद पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे, योगेश म्हात्रे, भाऊ चौधरी, दीपेश म्हात्रे, आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरे, औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यांचा शाश्वत विकास करत असताना समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण या सर्व घटकांचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे रस्ते, उद्याने, शाळा, स्वच्छ हवा व पाणी आणि आरोग्य सुविधा कडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आज कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विकास कामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्य शासनाने अतिशय चांगली कामे केली आहेत. कोविड काळात केलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. यापुढे ही या भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी कामे केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




