More and more farmers should benefit from Pradhan Mantri Crop Insurance Scheme – Divisional Commissioner Dr. Nidhi Pandey
अमरावती महाराष्ट्र

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरणार

अमरावती : हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विम्याचा लाभ दिला जाणार असून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरणार आहे. या योजनेचा विभागातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमरावती तालुक्यातील पिंपरी (गोपाळपूर) येथील पेरणी सुरु असलेल्या अविनाश पांडे यांच्या शेतात विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चेडे, तालुका कृषी अधिकारी निता कवाने, कृषी सहायक छाया देशमुख यांच्यासह स्थानिक शेतकरी बांधव आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या पीक विमा योजना, फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, तुषार संच, बि-बियाणे, खतांचे वितरण, कृषी अवजारे आदी विविध योजनांची माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना द्यावी. पीएम किसान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. सध्या चांगला पाऊस झाल्याने सर्व क्षेत्रावर पेरण्या होतील व खरीप हंगाम चांगला जाईल, अशी आशा विभागीय आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी विभागीय आयुक्तांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर महल्ले यांना मिळालेल्या लाभासंबंधी माहिती जाणून घेतली. पौष्टिक तृणधान्य किटचे वितरण त्यांना करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वन्यप्राणी रोही व रानडुक्कर यांच्यापासून पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावर वन विभागाशी चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्तांकडून पेरणीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी
सोयाबीन पिकाची ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणारी पेरणी, बैलचलित व सरी वरंब्यावर मानवचलित टोकण यंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाची विभागीय आयुक्तांनी पाहणी करुन माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी सरीवरंबा पध्दतीने पेरणी करण्याचे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केले.

विभागात 28 लाख हेक्टर क्षेत्रावर 90 टक्के पेरणी – विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे
विभागात पावसाला उशीरा सुरुवात झाली तरी, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जुलै महिन्यात विभागात सर्वत्र सरासरी 100 मिमी. च्यावर पाऊस झाला आहे. विभागात सर्वच ठिकाणी पीक पेरणीला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील 31 लाख हे. पेरणी क्षेत्रापैकी 28 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 90 टक्के पेरणी झाली आहे. यात सोयाबीन, तूर व इतर तृणधान्य पिकांचा समावेश आहे. जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने मूग व उडीद क्षेत्राच्या पेरण्या होऊ शकल्या नसल्याने त्याठिकाणी सोयाबीन, तूर या पिकाखाली ते क्षेत्र घेतल्या जाईल, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक मुळे यांनी यावेळी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत