नागपूर : भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाला तोंड देण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने नमूद केले की, अधिकाऱ्यांनी उपाययोजना करूनही रस्त्यावर अशा कुत्र्यांना खायला घालणाऱ्या काही नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. अशा नागरिकांनी कुत्र्यांना पाळावे आणि त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांना खायला द्यावे, अशी सूचना यावेळी केली.
खंडपीठाने निरीक्षण नोंदवले कि, “स्वतःला भटक्या कुत्र्यांचे सहानुभूतीदार आणि मित्र म्हणून भासवणारे हे नागरिक समाजाची किती मोठी हानी करत आहेत याची जाणीव न ठेवता भटक्या कुत्र्यांना अन्नाची पाकिटे आणि वेगवेगळे पदार्थ देतात. भटक्या कुत्र्यांच्या या कथित मित्रांना त्यांच्या दातृत्वाचे घातक परिणाम जाणवत नाहीत. प्राणीप्रेमींनी दिलेल्या गुडीजमुळे अनेक भटके कुत्रे उद्धट बनतात आणि सामान्यत: मानवांबद्दल आणि विशेषतः लहान मुलांबद्दलच्या वागणुकीत ते अधिक हिंसक बनतात.”
भटक्या कुत्र्यांच्या या तथाकथित मित्रांना भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि कल्याण करण्यात खरोखरच रस असेल तर त्यांनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे, त्यांना घरी नेले पाहिजे किंवा किमान त्यांना चांगल्या श्वान निवारागृहात ठेवावे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे त्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची देखभाल, आरोग्य आणि लसीकरणासाठी सर्व खर्च उचलावा आणि नंतर त्याच्यावर प्रेम व आपुलकीचा वर्षाव करावा, असे खंडपीठाने म्हटले आहे.
“त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की खरी धर्मादाय पूर्ण काळजी घेण्यात असतो, फक्त खाऊ घालून नंतर या गरीब प्राण्यांना स्वतःचे पालनपोषण करण्यासाठी सोडण्यात नाही. भटक्या कुत्र्यांबद्दल खरा कळवळा असेल तर परोपकारी व्यक्तीने हे सर्वात मूलभूत कर्तव्य केले पाहिजे. परंतु तथाकथित भटक्या कुत्र्यांचे मित्र त्यांचे हे मूलभूत कर्तव्य पार पाडण्यास टाळाटाळ करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची अनियंत्रित वाढ आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे नागपूर आणि आसपासच्या परिसरात कोणत्याही नागरिकाने किंवा रहिवाशाने सार्वजनिक ठिकाणे, उद्यान इत्यादी ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये, असे निर्देश खंडपीठाने दिले.
न्यायालयाने पुढे नमूद केले की, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ४४ भटक्या कुत्र्यांना नष्ट करण्यास परवानगी देते. अधिकार्यांनी ते नष्ट करण्याइतपत नाही पण त्यांना ताब्यात घेण्याचा विचार करावा, असे आदेश दिले आहेत.
खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की “याचा अर्थ असा नाही की कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे या मतामध्ये काहीतरी चुकीचे आहे. परंतु, भटक्या आणि पाळीव प्राणी म्हणून न ठेवलेल्या कुत्र्यांचा विचार करताना हे लक्षात घेतले पाहिजे की भटके कुत्रे आक्रमक, क्रूरपणे जंगली असू शकतात आणि त्यांचे वर्तन फक्त अनियंत्रित असते.”




