मुंबई : सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाकडून मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उद्यापासून मात्र महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.उद्या पासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता.येत्या 5दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/Vtfjzurle4
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 1, 2021




