बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका 20 वर्षीय परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून पोलिसांचा त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईहून हैदराबादकडे रेल्वेने प्रवास करत होती. परळी स्टेशनवर उतरून ती हॉटेलमध्ये जेवत असताना परिसरातील तृतीयपंथी पूजा गुट्टे हिने तिला बघितले, तिने तरुणीशी संवाद साधला. त्यानंतर तिला काम देण्याचे आमिष दाखवत तिने साथीदार सतीश मुंडे आणि मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी पीडितेला मोटरसायकलवरून अस्वलांबा येथे नेले, जिथे भागवत कांदे याच्यासह तिघांनी तिच्यावर अत्याचार केला.
घटनेदरम्यान गावातील एका सतर्क नागरिकाने पोलिसांच्या टोल फ्री 112 क्रमांकावर माहिती दिली. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना अटक केली. मात्र आरोपी पूजा गुट्टे फरार असून तिचा शोध सुरू आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर राहिला नसल्याची चर्चा होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी अशा घटनेवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांना धडा शिकवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




