ब्रिटनमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एक आई तिच्या 20 महिन्यांच्या बाळाला घरामध्ये विसरून ६ दिवस पार्टी करायला निघून गेली. तिचा वाढदिवस मित्र-मैत्रिणींसह साजरा करण्यासाठी ती बाहेर गेली होती. यावेळी ती आपल्या मुलीला विसरली. सहा दिवसांनी जेव्हा ती घरी परतली तेव्हा त्या बाळाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे.
वर्फी कुडीची मुलगी असिया या छोट्या बाळाचा डिसेंबर 2019 मध्ये एका फ्लॅटमध्ये सहा दिवस अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्यादरम्यान, तिची आई तिचा 18 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडन, कॉव्हेंट्री आणि सोलिहुल अशा अनेक ठिकाणी पार्ट्या करत होती. जेव्हा ती 6 दिवसांनी आपल्या घरी परत आली, तेव्हा तिने 999 ला कॉल केला आणि त्यांना सांगितले की तिची मुलगी उठत नाहीये. त्यानंतर आसियाला रॉयल अलेक्झांड्रा या मुलांच्या रूग्णालयात नेण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
मुलीच्या मृत्यूनंतर तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले, ज्यात मुलीची योग्य काळजी न घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. 5 ते 11 डिसेंबरपर्यंत ही मुलगी घरात एकटी पडलेली होती. तिला अन्नपाणी मिळाले नाही, ज्यामुळे तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले की, 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.39 वाजता वर्फी कुडी इमारतीतून बाहेर पडली. 11 डिसेंबर पर्यंत ती परत आली नाही, पूर्ण सहा दिवसानंतर ती घरी परतली. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज देखील कोर्टाला दिले आहेत, ज्यामध्ये वर्फी कुडी लंडन, कॉव्हेंट्री आणि सोलिहुलमध्ये पार्ट्या करताना दिसत आहे. वर्फी कुडी हिने तिचा गुन्हा मान्य केला आहे. सध्या ती कोठडीत असून मे महिन्यात तिला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.