नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसवर आधारित गेम ‘सेलमॉन भोई’ (Selmon Bhoi) वर मुंबई दिवाणी न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायाधीश के. एम. जायस्वाल यांनी हा गेम बनवणारी कंपनी पॅरोडी स्टूडिओज प्रायव्हेट लिमिटेडला गेम आणि कोर्ट संबंधित कोणत्याही कंटेट किंवा प्रसार, त्याला लाँच करणे किंवा रिलाँच करणे किंवा रि प्रोड्युस करण्यावर बंदी घातली आहे. तसेच ही गेम गुगल प्ले स्टोअर आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
मुंबई दिवाणी न्यायालयाने म्हटले की, गेम आणि तिचा फोटो पाहून असे दिसते की ही गेम सलमान खानच्या हिट अँड रन केस संबंधित आहे. सलमान खानने कधीच या गेमसाठी परवानगी दिली नाही. हे प्रकरण त्याच्या विरुद्ध प्रकरणाशी मिळते जुळते आहे आणि सलमान खानने या गेमसाठी आपली परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यात त्याच्या वैयक्तिक अधिकारांचे हनन झाले असून त्याच्या इमेजलाही धक्का पोहोचला आहे.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या खेळाबद्दल समजल्यानंतर अभिनेता सलमान खानने न्यायालयात धाव घेतली होती. सलमान खानने गेम बनवणाऱ्या विरुद्ध याचिका दाखल केली होती. कोर्टापुढे हे सादर करण्यात आले की गेमचे शीर्षक ‘सेलमॉन भोई’ चा उच्चार हा सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमान भाई पद्धतीने होत आहे. या गेमला आपली परवानगी नसल्याचे सलमानच्या वतीने सांगण्यात आले. हा गेम पूर्णपणे हिट अँड रन केसवर बेस्ड आहे. यात सलमान खानचा कार्टूनसारखा वापर केला आहे. याप्रकरणी आता सलमान खानला दिलासा मिळाला आहे.




