मुंबई : लोकप्रिय पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यामुळे संगीतक्षेत्र आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी परिसरात एका गंभीर मोटारसायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिमला येथे जात असताना झालेल्या भीषण अपघातात त्याच्या डोके आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. अत्यंत गंभीर अवस्थेत जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले असताना वैद्यकीय पथकाने अथक प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे अखेर त्यांचे निधन झाले.
राजवीर जवंदा पंजाबमधील लुधियान्यातील पोना गावाचे रहिवासी होते. त्यांनी पंजाबी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या हिट गाण्यांमध्ये ‘तू दिस पेंदा’, ‘खुश रहा कर’, ‘सरदारी’, ‘सरनेम’, ‘अफरीन’, ‘लँडलॉर्ड’, ‘डाऊन टू अर्थ’ आणि ‘कंगनी’ यांचा समावेश आहे.
संगीत क्षेत्रासोबतच राजवीरने पंजाबी चित्रपटातही अभिनय केला. त्यांनी ‘सुबेदार जगरूप सिंग’ (२०१८), ‘जिंद जान’ (२०१९) आणि ‘मिंटो तसेल्डर्नी’ (२०१९) यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
राजवीर यांच्या दुर्दैवी निधनानंतर, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, सहकारी कलाकार आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. राजवीर जवंदा हे पंजाबी संगीतक्षेत्रातील उगवता तारा होते, त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये आणि संगीतजगतामध्ये शोककळा पसरली आहे.