पुणे : रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता नाइट शिफ्टसाठी कंपनीत निघाली होती. अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन या महिलेवर बलात्कार केल्याची घटना चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली. त्यानंतर आरोपीने पळ काढला.
पोलिसांनी सांगितले की, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मे रोजी रात्री 11:15 ते 11:45 वाजताच्या सुमारास, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्सच्या मागे एक 27 वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. घटनास्थळी कोणीही दिसत नसल्याने महिला घाबरली होती. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तसेच सुटका करून घेण्यासाठी तिने आरोपीचा चावाही घेतला. मात्र, आरोपीने तिच्यावर बलात्कार करून मारहाण केली आणि याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पळ काढला. दरम्यान, या प्रकारानंतर एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात होते. त्यांच्या मदतीने शंभर नंबरवर फोन करून पीडित महिलेने पोलिसांना बोलावून घेतले. महिलेला तातडीने ‘वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहकार्याने सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासादरम्यान आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चाकण पोलिसांनी विविध कलमाच्या अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




