कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी रूग्णसंख्या आणि प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं कि, “जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या (५ मे) 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा.
गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्हिटीचा दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे,’ असं म्हणत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील भीषण परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.




