नागपूर : मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी चौक परिसरात घडली. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू (वय 40, रा. शाहू मोहल्ला, वृंदावननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भंगारचा व्यवसाय करीत होते. दरम्यान, या थरारक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सचिन यांचा मुलगा प्रीत याचा पहिला वाढदिवस होता. त्यांनी संध्याकाळी नातेवाइक आणि मुलांसाठी छोट्या समारंभाचे आयोजन केले होते. सकाळी ते भाजपच्या एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर, दुपारी २ वाजता त्यांनी विटभट्टी चौकातील एका हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन ते दुचाकीवरून घरी परतत असताना चार युवक दोन दुचाकींवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांना अडविले. त्यानंतर दोघांनी धारदार शस्त्रांनी सचिन यांच्यावर वार केले. ते गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी तत्काळ पसार झाले.
पूर्वीचा वाद ठरला कारणीभूत?
सूत्रांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान सोनू नावाचा युवक मंडपात येत असताना मांसाहार करून आल्याची भाषा करायचा. याबाबत सचिन यांनी त्याला फटकारले होते. या कारणावरून सोनू संतापला होता.
यानंतर त्याच युवकाने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सचिन यांच्या घरावर हल्ला केला होता. सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याने त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सोनूविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. याच रागातून सोनूने साथीदारांच्या मदतीने सचिनची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या निर्घृण हत्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व संताप पसरला असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




