Air India flight crashed near the Ahmedabad airport, at least 242 passengers were onboard
देश

गुजरातमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले; आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात किमान २४२ प्रवासी होते. विमानाने अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघनीनगर परिसरात ते कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. एअर इंडियाच्या विमान अपघातात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विमान धडकल्याने मोठा स्फोट व आगीचे लोळ उसळल्याचे पाहायला मिळाले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आणि वातावरणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर काही मिनिटांतच डझनभर रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना वेगाने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून, “घटनेबद्दल ऐकून मी हादरलेलो आहे. सर्व विमान वाहतूक व आपत्कालीन सेवा संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

ग्रीन कॉरिडॉर आणि वैद्यकीय मदत
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व संबंधित रुग्णालयांना तत्काळ आणि सर्वोच्च प्राथमिकतेने वैद्यकीय मदत पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तातडीने तपास समिती स्थापन केली असून, विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विमानात असलेल्या प्रवाशांच्या यादीची पडताळणी केली जात आहे.

प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळाजवळ न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत