मुंबई : १४ व्या विधानसभेची मुदत आज २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी राज्यभवनावर दाखल झाले आहेत. त्याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस देखील सागर बंगल्यावरुन राजभवनामध्ये पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेची आज मुदत संपत आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्याआधी एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला असला तरी सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.
राजीनाम्याची प्रक्रिया ही संविधानिक प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर जे विद्यमान सरकार असतं त्यांना विधीमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. ते मंत्रिमंडळ विसर्जित केलं जातं. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडतो आणि नवीन विधिमंडळ स्थापित होतं.




