छत्तीसगड : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. राजनांदगाव खैरागड मार्गावरील सिंगारपूर गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारने अचानक पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळून खाक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालोद जिल्ह्यातील लग्न समारंभात सहभागी होऊन हे कुटुंब खैरागडला परतत होते. दरम्यान शिकारपूर गावाजवळ त्यांच्या अल्टो कारला अपघात झाला. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की त्यात बसलेल्या पाच जणांना गाडीतून बाहेरही पडता आले नाही. कारमध्ये बसलेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते. या प्रकरणी पोलीस अद्याप तपास करत आहेत. सहकारी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.
कारचा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला. पुलाला धडकल्यानंतर अल्टो कार पलटी झाली, त्यामुळे तिला आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये खैरागडमधील गोलबाजार येथील रहिवासी कोचर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या २०-२५ वयोगटातील तीन मुलींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमके कारण तपासानंतरच समोर येईल.




