मुंबई : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी आज मुंबईत झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अजय याने या वृत्ताला दुजोरा दिला. माया गोविंद यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या आणि त्यांना युरिन इन्फेक्शनसारख्या आरोग्याच्या समस्या होत्या.
माया गोविंद यांच्या पार्थिवावर दुपारी ३ नंतर पवन हंस स्मशानभूमी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 80 वर्षीय गीतकार माया गोविंद या जवळपास दोन महिन्यांपासून आजारी होत्या.
माया गोविंद यांनी जवळपास 350 चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आणि टीव्ही शोसाठी गीतेही लिहिली आहेत. त्यांच्या काही लोकप्रिय गाण्यांमध्ये आंखों में बसे हो तुम (टक्कर), मैं खिलाडी तू अनाडी (शीर्षक गीत), गले में लाल टाई (हम तुम्हारे हैं सनम) आणि ठेहरे हुए पानी में (दलाल) यांचा समावेश आहे. किस्मत आणि मायका या टीव्ही शोची शीर्षकगीते त्यांनी लिहिली. नाटककार विजय तेंडुलकर यांचे प्रसिद्ध स्टेज नाटक ‘खामोश! अदालत जारी है’ मध्ये वेणारेबाईच्या अविस्मरणीय अभिनयासाठी त्यांना 1970 मध्ये संगीत नाटक अकादमी, लखनऊ तर्फे “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




