मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे नृत्य आणि संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी भारतीय कलेचे वैभव सातासमुद्रापार नेले. कला क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा मानदंड निर्माण केला. नृत्य, संगीत हेच त्यांचे आयुष्य होते. ते सर्जक कला उपासक होते. त्यांचे कलारसिकांच्या हृदयातील स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना विनम्र श्रध्दांजली.
राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या पं. बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ स्नेह होता. अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना कळवतो.




