सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यास मान्यता मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत.
नगरमध्ये बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले, “सुशांत प्रकरणात भरपूर गोष्टी पुढे यायच्या आहेत. या प्रकरणातील जी मुख्य आरोपी अभिनेत्री आहे, ती खरचं भारतात आहे का, अशी शंका उपस्थित होतेय. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्यानंतर काय वास्तविकता आहे, ती समोर येईल याची खात्री आहे, पण संबंधित अभिनेत्रीचा फक्त वकिल बोलतोय. त्या कुठे दिसत नाही. त्यामुळे त्या खरंच इथे आहेत का? यामध्ये किती मोठे षडयंत्र असू शकते? हे सीबीआयच्या माध्यमातून जनतेसमोर येईल, असंही विखे म्हणाले.
आयपीएस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. मुळात यापूर्वी आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केलं नाही, पण आयपीएस अधिकाऱ्याला केलं. याचं कारण काय? याचं उत्तर येणाऱ्या काळात सरकारला द्यावं लागेल, असंही विखे म्हणाले.




