मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणप्रकरणी कोठडीत असणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय याबाबत निकाल देणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या कायदेशीर पथकाने भायखळा जेलच्या एसपींना पत्र लिहून त्यांच्यावर तात्काळ उपचाराची मागणी केली आहे. पत्रात लिहिले आहे की, नवनीत यांच्या पाठीत वेदना होत असून हे त्यांचं जुनं दुखणं आहे. कोठडी दरम्यान, नवनीत राणा यांना सतत जमिनीवर बसावे लागत आहे, तसेच जमिनीवर झोपावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्या वेदना असह्य झाल्या आहेत.




