मुंबई : जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी परिसरात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंटचा ब्लॉक खाली पडल्याने संस्कृती अनिल अमिन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची वेळ सकाळी सुमारे ९.३० ची असून, संस्कृती कामासाठी जात असताना उंच इमारतीवरून पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने तिच्या डोक्यावर जबर मार बसला. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत तिला रिक्षाने रुग्णालयात हलवले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
संस्कृती अनिल अमिन (वय २२) ही जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी परिसरात कुटुंबासह राहत होती. तिचे वडील अनिल उमेश अमिन (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संस्कृतीने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव (प.) येथील RBL बँकेत नोकरीस जात होती. नेहमीप्रमाणे ती आज सकाळी कामासाठी निघाली असताना हा अपघात घडला. अनिल अमिन यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “मी घरात नाश्ता करत असताना बाहेरून गोंधळाचा आवाज आला. बाहेर आलो तेव्हा लोकांची गर्दी दिसली. पुढे गेल्यावर पाहिले असता, माझी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. विचारणा केली असता कळले की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पांढरी सिमेंट वीट तिच्या डोक्यावर पडली होती.”
घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बांधकामस्थळावरील सुरक्षेच्या दुर्लक्षाबाबत तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडतात. ते टाळण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.