कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. तर टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. तर लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असंही थोरातांनी नमूद केलं.




