राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.
बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ३१ डिसेंबर रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मे पासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून होणार असल्याचं म्हटलं आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल.




