नागपूर : आजच्या काळात सगळीकडे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात एका अल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वय फक्त 17 वर्षे आहे, तर तिच्या प्रियकराचे वय 27 वर्षे आहे. दरम्यान मुलगी गरोदर राहिली, पण भीतीपोटी तिने हे कोणालाही सांगितले नाही. त्याऐवजी तिने YouTube वर गर्भपात करण्याचा मार्ग शोधला. नंतर गुपचूप तिने त्यात सांगितल्याप्रमाणे काढा बनवला आणि पिऊन टाकला. मात्र काही वेळाने तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
दुसरीकडे, नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय गुन्हेगार सुनील मानेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुनील माने याचा शोध घेत आहेत. तर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




