Sinhagad Fort
सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे आणि हा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
इतिहास :
हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले. परंतु सिंहगड हे नाव आधीपासुनच होते. इतिहासकार श्री.ग. ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड‘ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे.
शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरी उल्लेख आढळतो, “तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने ‘कोंडाणा आपण घेतो‘, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. एक प्रहर मोठे युद्ध झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा, याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला.”
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला‘.
माहिती :
उंची : ४४००फुट.
प्रकार : गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव : सिंहगड
डोंगररांग : भुलेश्वर
सध्याची अवस्था : जीर्ण
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.
मार्ग : स्वारगेट पुणे – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.
गडावर राहण्याची सोय नाही. गडावर जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
गूगल मॅप (सिंहगड किल्यावर जाण्याचा मार्ग ) :
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…