बारामतीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत होता आणि काही गोळ्या देत असल्याचे मयत तरुणीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.
मयत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण केले होते. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी तिने ऑक्टोबर २०२५ पासून पुण्यात ट्यूशन्स सुरू केल्या होत्या. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीमार्फत आईला मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि अथर्व यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाहही ठरला होता. मात्र, काही दिवसांपासून तरुणी शांत राहत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले होते.
तरुणीच्या मैत्रिणीने अथर्व वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत असल्याचे तसेच तो तिला काही गोळ्या देत असल्याचे सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.
६ ऑगस्ट रोजी अथर्व तरुणीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी घेऊन गेला होता. अथर्वची आई आणि मावशी यांना दौंड येथे सोडण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते. आईने व्हिडिओ कॉल केला असता तरुणी अथर्वसोबत कारमध्ये असल्याचे दिसले.
सायंकाळी सातच्या सुमारास आईने मुलीला फोन केला; मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर अथर्वला फोन केल्यानंतर आईचे मुलीशी बोलणे झाले. त्या वेळी अथर्व मला घरी घेऊन जाणार असून, त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला गोळी देणार असल्याचे मुलीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
आईने मुलीला अथर्वच्या घरी जाऊ नकोस आणि तातडीने घरी परत ये, असे सांगितले होते. रात्री नऊच्या सुमारास आईने मेसेज केल्यानंतर मुलीने जेवण करीत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर ते अथर्वच्या घरी गेले. रात्री दहाच्या सुमारास आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला आणि तरुणीला चक्कर आल्याचे सांगितले.
प्रकृती बिघडल्यानंतर अथर्व तरुणीला प्रथम देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोईटे हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे घेऊन गेला. रात्री सुमारे १०.२० वाजता तिची आई सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यावेळी तरुणी स्ट्रेचरवर होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे आईला समजले.
या घटनेनंतर आईने मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषधे, वैद्यकीय अहवाल तसेच डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…