Planning should be done so that industries in districts will continue even in the third wave of corona - CM
मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिडन्स) व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या दोन लाटेमधील हा काळ संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करा
अजून कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करताना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
गर्दी टाळा
आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात, त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण समारंभही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सीजन निर्मिती, ऑक्सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सी
पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा दर आणखी कमी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देश ही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
जिद्द कायम ठेवा
कोरानामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी, वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या तसेच तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारीही सांगितली, तेव्हा कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतूकास्पद आहे ती कायम ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस वाढवून मागावेत- टोपे
चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, त्याकडे लक्ष वेधले. ऑक्सीजनची तयारी पूर्णत्वाला नेतांना जिल्ह्यांनी त्याच्या तांत्रिक आणि दर्जात्मक गुणवत्तेची काळजी घ्यावी, परमिट टु वर्क चा परवाना मिळवावा, सर्व काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचना दिल्या.
ते पुढे म्हणाले की, कोरोना उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, यासाठी ऑडिटर्सची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्यांनी सर्व जिल्ह्यांनी फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल करण्याच्या सूचनेचा पुनरूच्चार केला. जिल्ह्यांनी कोरोना बाधितांची माहिती दररोज अद्ययावत (रिअल टाईम डेटा) स्वरूपात अपलोड करावी, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…