Honoring the parliamentary work of Dr. Keshavaraoji Dhondge, former senior member of the Legislature, in the Vidhan Bhavan
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. डॉ.केशवराव धोंडगे यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खनिकर्म मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधिमंडळातील विविध पक्षांचे गटनेते, विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी धोंडगे यांच्या पत्नी सौ. प्रभावती, चिरंजीव पुरुषोत्तम यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ. नार्वेकर यांनी धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख करीत शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गऊळ गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी १९४८ मध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधारमधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जनतेच्या न्याय हक्कासाठी धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.
नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजोपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे धोंडगे यांनी दाखवून दिले आहे. श्री. धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली. सन १९९१ पासून येथे दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श्री. धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. ‘जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले असून त्यांनी आजतागायत सुमारे ३० पुस्तकाचे लेखन केले आहे. ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’, ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार’, ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’, ‘भारतीय विकास रत्न अवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…