Along with giving top priority to agriculture, there is a need to impart agricultural technology education in Marathi language
अहमदनगर : कोरोना काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रिये रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादाजी भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील,अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ उपस्थित होते. यावेळी खासदार शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची विकासाकडे वाटचाल होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ही कोश्यारी यांनी सांगितले. शरद पवार व नितीन गडकरी यांनी कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम केले आहे. त्यांना देण्यात आलेल्या डी.एस्सी पदवींमुळे या पदवीची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गारही कोश्यारी यांनी काढले.
कृषीमंत्री भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठातील बहुतेक विद्यार्थी प्रशासनात मोठ्या पदापर्यंत जातात. अशा उच्च पदावरील विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील प्रश्न, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तळमळ ठेवावी. पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 70 टक्के महिला आहेत. ही प्रशंसनीय बाब आहे. सेंद्रीय शेती, प्रक्रिया उद्योग व विपणन यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहेत. फळबाग लागवडीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. यात कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे.
कुलगुरु राठौड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला जाणार आहे. कृषी शिक्षणात माहिती- तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनावर भर दिला पाहिजे.
पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 11 हजार 468 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात आले. त्यात विविध विद्याशाखातील दहा हजार 736 स्नातकांना पदवी, 628 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 104 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित करण्यात आले. यावेळी विविध शाखेतील यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिके प्राप्त स्नातक व आचार्य पदवी प्राप्त स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा मराठी भाषेचा आग्रह दिसून आला. दीक्षांत समारंभ प्रास्ताविक सुरू असतानाच त्यांनी पुढील प्रास्ताविक व कार्यक्रम मराठी भाषेत करण्याच्या सूचना केल्या.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…