Chief Minister Devendra Fadnavis approves Namokar Tirtha development plan in Nashik
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटी 35 लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली.
आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थ स्थळी येण्याचे समाधान मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने कामे करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
या ठिकाणी 6 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील 24 कोटी 26 लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता 12 कोटी 9 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सुविधा येथे उपलब्ध करून द्याव्यात. देश – विदेशातून येथे भाविक येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भविष्यात भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून 10 ते 15 लाख भाविक येतील. हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, सचिव (नियोजन) शैला ए, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात णमोकर तीर्थ विकास आराखडा
जैन धर्मस्थळ असून नाशिक – धुळे महामार्गावर मौजे मालसाने गावाजवळ 40 एकर भूभागावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे. तसेच ठिकाणी 6 ते 25 फेब्रुवारी 2026 कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, 450 युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…