UV-360 sanitizer module robot

रोबोट करणार कोविड निर्जंतुकीकरण, UV-360 सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन

तंत्रज्ञान महाराष्ट्र

कोविडचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उदय सामंत म्हणाले कि, रुग्णालये, हॉटेल्स, व्यावसायिक जागा अशा ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल. तंत्रज्ञान विकसन प्रक्रियेत आधुनिक महाराष्ट्र कोठेच कमी नाही. विशेषतः विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसित झाले याचा आनंद आहे. राज्यातील रोबोटिक्स क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असून भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या प्रयत्नातून ‘युव्ही – ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट'(तारा)ची निर्मिती झाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कोरोना विषाणू व तत्सम सुक्ष्मजीवांचे निर्जंतुकीकरण करणे साध्य होणार आहे.

मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तत्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने मोजमाप घेऊन निर्जंतुकीकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० ची खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.

रोबोटमध्ये असलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ॲपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.

रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत