IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले तीन तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडू आहेत. यंदा चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर सर्वांचे लक्ष होते, त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत धमाकेदार कामगिरी केली आहे.
ऋतुराज सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 626 धावा पंजाबचा कर्णधार केएल राहुलने केल्या आहेत, सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर 603 धावा बनवून ऋतुराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी ऋतुराजला केवळ 23 धावांची गरज आहे. अंतिम सामन्यात तो ऑरेंज कॅप नक्कीच मिळवेल, अशी चाहत्यांना खात्री आहे. तिसऱ्या क्रमांकावर ५५१ धावांसह दिल्लीचा शिखर धवन आहे. ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही 22 षटकार लगावत दुसऱ्या स्थानी आहे. तर सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या यादीतही तो 61 चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर ६२ चौकारांसह शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे.
दुबईमध्ये कालच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. त्याबरोबरच चेन्नई सुपर किंग्सने 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने धमाकेदार कामगिरी करत 50 चेंडूत 70 धावा केल्या.




