PBKS vs MI IPL 2024 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता. आता आयपीएल 2024 मध्ये पंजाबचा सातवा सामना आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. पण शिखर धवन या सामन्यात पुनरागमन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. आता पंजाबचे बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी धवनच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. सुनील जोशी यांनी सांगितले की, खांद्याच्या दुखापतीनंतर धवनचे पुनर्वसन सुरू आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोशी म्हणाले की, सध्या धवन वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. टीम आम्हाला धवनबद्दल सतत अपडेट देत आहे. तो सध्या पुनर्वसनात असून त्याच्या अनुपस्थितीत करण संघाची जबाबदारी सांभाळत आहे. गेल्या वर्षीही धवनला दुखापत झाली होती, तेव्हा त्याच्या जागी करण कर्णधार होता आणि त्याने संघाचे नेतृत्व चांगले केले होते, त्यामुळे आम्हाला करणवर पूर्ण विश्वास आहे.
पंजाब किंग्जचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी संकेत दिले होते की, धवन किमान सात ते 10 दिवस मैदानाबाहेर राहू शकतो. धवनच्या अनुपस्थितीत करन संघाची धुरा सांभाळेल, असेही त्याने सांगितले होते. गुरुवारी पंजाबचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. याशिवाय 21 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धवनचे खेळणेही साशंक आहे.