IPL 2021 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यांत 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे. या हंगामात मुंबई आणि राजस्थान यांच्यातील पहिला सामना 29 एप्रिल रोजी खेळला गेला. मुंबईने तो सामना 7 गडी राखून जिंकला.
या मोसमात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ लढत आहेत. नेट रन रेटच्या बाबतीत, कोलकाता (+0.294) सर्वोत्तम स्थितीत आहे. राजस्थान (-0.337) आणि मुंबई (-0.453) यांना विजयासह त्यांचे नेट रन रेट सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.
गतविजेत्या मुंबई संघाला या मोसमात चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सचे अनेक स्टार खेळाडू सध्या आउट ऑफ फॉर्म आहेत. कर्णधार रोहित शर्मा स्वतः फारशा चांगल्या स्थितीत नाही. हार्दिक पंड्या फक्त एका सामन्यात चांगला खेळ दाखवू शकला आहे. मात्र, तो अजूनही गोलंदाजी करत नाही. पोलार्ड देखील त्याच्या प्रतिष्ठेनुसार खेळू शकला नाही. इशान किशनला मागच्या सामन्यात ड्रॉप करावे लागले.




