नवी दिल्ली : क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. दिल्ली देहराडून रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुभाजकाला धडकली आणि नंतर गाडीने पेट घेतला. अपघात एवढा भीषण होता की कार पूर्णत: जळून खाक झाली. या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाता-पायाला, डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्यात. त्याला अपघात स्थळाजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नारसन बॉर्डरजवळ पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास ऋषभच्या मर्सिडीज कारचा अपघात झाला. ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. झोपेत असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून दुभाजकावर जोरात आदळली. यादरम्यान कित्येक वेळा गाडीने पलटी मारल्या. गाडीने रेलिंगला जोरदार धडक दिल्याने कारला आग लागली. कारचा बोनेटसह पुढचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, ऋषभ पंतने वेळीच गाडीच्या खिडकीतून बाहेर उडी मारली आणि त्याचा जीव थोडक्यात वाचला.
No serious injuries to the cricketer, says doctor!#RishabhPant #Cricket #GetWellSoon pic.twitter.com/6WspbVPdhd
— Sportiqo (@sportiqomarket) December 30, 2022
ऋषभ पंतला रुरकी येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीवर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याबाबतचे अपडेट देखील समोर येत आहेत. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी जातीने लक्ष घालून डॉक्टरांना उपचारासंदर्भात योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, तसेच ऋषभवरील उपचाराचा सगळा खर्च उत्तराखंड सरकार करेल, अशी घोषणाही केली आहे.