Hyderabad won by 6 wickets

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा ६ गडी राखून विजय; बंगळुरूचे आव्हान संपुष्टात

क्रीडा

अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

RCB ने विजयासाठी दिलेल्या १३२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकात श्रीवत्स गोस्वामीला माघारी धाडलं. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडलं. दुसऱ्या विकेटसाठी वॉर्नरने पांडेसोबत ४१ धावांची भागीदारी केली. यानंतर मनिष पांडेही झॅम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. त्याने २४ धावा केल्या. युवा प्रियम गर्गला चहलने आपल्या जाळ्यात अडकवत हैदराबादला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर केन विल्यमसनने सावध खेळ करत डाव सावरला. जेसन होल्डरने विल्यमसनला साथ दिली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने २ तर झॅम्पा आणि चहलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, हैदराबादच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे RCB चा संघ फक्त १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला. एबी डिव्हीलियर्सचा अपवाद वगळता RCB चा एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. डिव्हीलियर्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, टी. नटराजनने २ तर शाहबाज नदीमने १ बळी घेतला.

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली स्वतः फलंदाजीसाठी सलामीला आला. परंतू दुसऱ्याच षटकात जेसन होल्डरने विराट कोहलीला(6) यष्टीरक्षक श्रीवत्स गोस्वामी करवी झेलबाद केलं. देवदत पडीकलही लगेचच माघारी परतला. होल्डरच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गने त्याचा झेल घेतला. RCB चा संघ संकटात सापडलेला असताना फिंच आणि डिव्हीलियर्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. शाहबाद नदीमने फिंचला(३२) आपल्या जाळ्यात अडकवत RCB ला तिसरा धक्का दिला. यानंतर त्याच षटकात मोईन अली फ्रि-हीटवर धावबाद होऊन माघारी परतला. सोळाव्या षटकात RCB ने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. याच षटकात चौकार लगावत डिव्हीलियर्सने आपलं अर्धशतकही झळकावलं. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात डिव्हीलियर्स(56) नटराजनच्या यॉर्करवर माघारी परतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत