काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत.
“गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे. बिहारमधील पराभवाचे काँग्रेस नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असं पक्ष नेतृत्वाला वाटत असावं” असं कपिल सिब्बल म्हणाले.
आपल्या पक्षाची मोठी घसरण होते आहे हे सर्वप्रथम काँग्रेसने स्वीकारायला हवं. आपलं कुठे चुकत आहे, हे काँग्रेसला ठाऊक आहे. मात्र त्याबाबत कोणी काहीही बोलायला तयार नाही. हे असंच सुरु राहिलं तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहिल, असंदेखील कपिल सिब्बल म्हणाले.