पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप, जनता दल यूनायटेड, हिंदुस्तान आवाम पार्टी आणि विकासशील इन्सान पार्टी या चारही पक्षांची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत एनडीएच्या गटनेत्याची निवड केली जाणार असून त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापण्याचा दावा केला जाणार आहे. तसेच, रविवारी त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे.
“रविवारी दुपारी साडे बारा वाजता एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होईल. या बैठकीत बाकीचे सर्व निर्णय घेतले जातील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी काही औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. मंत्रिमंडळासाठी शिफारशीही राज्यापालांना पाठवल्या जातील. राज्यपालांनी या शिफारशी मान्य केल्यानंतरच नवं सरकार स्थापन करण्यावर विचार केला जाईल.” अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.