बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडेल का?
या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी कामगिरी करता आलेली नाही. याउलट भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपद भाजपावर अवलंबून असेल. ‘ब्राण्ड नितीश’ला खिंडार पडलेले नाही, असे नितीश यांच्या जवळच्या नेतेमंडळींनी या निकालाचे वर्णन केले. ‘या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले’ तसेच “सरकार स्थापना आणि नेतृत्वासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ” असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. “जो कल आहे तसेच निकाल लागले तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. आम्ही आमचा शब्द पाळू” असे विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.