नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले 16 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, “या कायद्यातील तरतुदींना आक्षेप असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग अवलंबावा.”
ते पुढे म्हणाले की, “मी शेतकरी नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी ही कोंडी फोडावी. सरकारनं चर्चेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यांच्या शंकेचं निराकरण करण्यात येईल. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही होत आहे. त्यात देशात कोरोनाचं संकट आहे. यात सामान्य जनताही भरडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं.”
कृषी मंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांवर अनेक दशकं अन्याय होतो आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने हे कायदे केले होते. तरीही शेतकरी संघटनांशी चर्चा करुन कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास आम्ही तयार आहोत, असंही कृषी मंत्री तोमर यांनी स्पष्ट केलं.